प्रदेशाध्यक्षपदी अद्याप तरी दानवेच ; ‘या’ बड्या नेत्याचा खुलासा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे त्यांची प्रदेशाध्यक्ष पदाची जवाबदारी कोण सांभाळमार याबाबत सध्या राज्यात चर्चा सुरु आहे. प्रदेशाध्यपदासाठी चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांच्या नावाची सध्या जोरात चर्चा आहे. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय घेतील. त्यामुळे सध्यातरी रावसाहेब दानवेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार असल्याचे भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सुद्धा गृहमंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे आधी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर राज्यातील प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे सध्या रावसाहेब दानवेच प्रदेशाध्यक्षपदी राहतील. या पदासाठी माझ्या नावाची सध्या चर्चा असली तरी अंतिम निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्षच घेतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील जागांबाबत विश्वास होता, मात्र बारामतीचा अंदाज चुकला. मात्र शरद पवार घराण्याची दमछाक करण्यास आम्हाला यश आले. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सध्या विचार सुरु आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. असंही पाटील म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत असलेला जागावाटबाबतचा फॉर्म्युला बदलणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.