धक्कादायक ! सांताक्रूझमध्ये मित्रांकडून मैत्रिणीवर ‘बलात्कार’ करून ‘खून’

सांताक्रूझ : पोलीसनामा ऑनलाइन – मागील आठवड्यापासून राज्यात महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे दररोज उघडकीस येत आहेत. हिंगणघाट प्रकरणानंतर औरंगाबादमधील प्रकरण समोर आले. तर पनवेलमधील एका महिलेला जाळण्याचा प्रयत्न करून तिचा गळफास देऊन खून केला. माटुंगा रेल्वे स्थानकावर एका विकृताने तरुणीची छेड काढल्याचा प्रकार काल समोर आला. या घटना ताज्या असतानाच सांताक्रूझमध्ये मित्रांनी मैत्रिणीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

तरुणीवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेमुळे सांताक्रूझमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी नराधम आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार संताक्रूझच्या पूर्वेकडील वाकोला इथल्या एका चाळीत घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही वाकोला येथील एका चाळीत आपल्या कुटुंबासोबत राहते. त्याच चाळीत एका खोलीत भाड्याने तीन तरूण रहातात. संध्याकाळी यातील दोघेजण दारू पित बसले असताना तरुणी त्यांच्या खोलीसमोरून गेली. त्यावेळी त्यांनी तिला बोलावून घेतले. पीडित तरुणी दोघांनाही ओळखत असल्याने ती खोलीत गेली.

दारुच्या नशेत असलेल्या दोन तरुणांनी मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्याने त्या दोघांनी तिला बेदम मारहाण केली. मारहाण करुन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. घडलेला प्रकार तरुणीने कोणालाही सांगू नये यासाठी त्या नराधमांनी तिचा खून केला. तिच्या तोंडावर उशी दाबून तरुणीचा खून करून ते दोघेजण तेथून फरार झाले.

दरम्यान, त्यांच्यासोबत राहणारा तिसरा साथीदार घरी आला त्यावेळी त्याला तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्याने याची माहिती तात्काळ शेजारी राहणाऱ्यांना दिली. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेद अहवालामध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याचे समोर आले. वाकोला पोलिसांनी बलात्कार आणि खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी आरोपींना ठाणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले.