महिला कार्यकर्तीचा काँग्रेस आमरदाराच्या मुलावर गंभीर आरोप, म्हणाली – ‘बलात्कार केला अन् जीवे मारण्याची धमकी दिली’

इंदूर : पोलीसनामा ऑनलाई –    मध्यप्रदेशातील बडनगरचे काँग्रेस आमदार मुरली मोरवाल यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार पुत्राने हॉटेलमध्ये नेऊन आपल्यावर बलात्कार केला. तसेच कुणाला सांगितल्यास जीवे मारल्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप युवा काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीने केला आहे. दरम्यान आमदार मोरवाल यांनी आपल्या मुलाविरुद्ध केलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

करण मोरवाल असे गुन्हा दाखल झालेल्या आमदार पुत्राचे नाव आहे. स्टेशन प्रभारी ज्योती शर्मा यांनी पीडितेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही काँग्रेसची एक कार्यकर्ती आहे. गेल्या वर्षी तिची करण सोबत ओळख झाली. करणने लग्नाचे अमिष दाखवून फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली असा आरोप पिडितेने केला आहे. आमदाराच्या मुलाने आपल्याला धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचे तिने म्हटले आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केल्याचे म्हटले आहे.