लग्नाचे आमिष दाखून तरुणीवर ‘बलात्कार’, पोलिसावर FIR

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर लग्नास नकार देणाऱ्या पोलिसाविरुद्ध हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मुंबई मुख्यालयात पोलीस शिपाई असलेल्या कर्मचाऱ्याने शहरात पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, विशाल उर्फ भय्यासाहेब हरी औटे (रा. वडगाव जि. हिंगोली) या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याशी शहरातील एका पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग घेत असताना ओळख झाली. औटे याने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यावेळी तो दौंड येथे पोलीस ट्रेनिंगमध्ये होता. पीडित तरुणी एकटी भाड्याच्या खोलीत रहात होती. त्यावेळी औटी हा 23 एप्रिल 2011 रोजी तिला भेटण्यासाठी आला होता.

औटे याने पिडीत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादीत केला. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल निघून गेला. त्यानंतर जुनमध्ये पीडित तरुणी त्याला दौंड येथे भेटायला गेली. त्यावेळी देखील त्याने तिच्यासोबत एका लॉजमध्ये शाररिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान त्याने शहरात येऊन पीडितेशी संबंध ठेवले. तरुणीने लग्नाचा आग्रह धरल्यावर त्याने तिला टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाल्यावर त्याने त्याचे लग्न झाल्याचे सांगितले, असे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पीडित तरुणीने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर तिने विशाल औटे याच्याविरुद्ध हर्सुल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी औटे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Visit : policenama.com

You might also like