मामेभावाकडूनच घाणेरडे कृत्य ! आत्याच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार, CCTV च्या मदतीने प्रकरणाचा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   हरियाणाच्या फतेहाबादमधून नात्यांना काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जेथे एका युवकाने आपल्या आत्याच्या 5 वर्षाच्या मुलीवर घरातच बलात्कार केला. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींना लवकरच अटक करण्याचा दावा करीत आहेत.

पोलिसांनी सांगितले कि, 20 वर्षांचा तरुण आपल्या काकूच्या घरी 15 दिवसांसाठी आला होता. यादरम्यान त्याने मुलीवर दोनदा बलात्कार केला. जेव्हा मुलीने वडिलांना याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी घरात बसविलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा संपूर्ण प्रकरण उघड झाले. त्यानंतर त्वरित ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. नातेवाईकांचे म्हणणे आहे की, आरोपी युवक मोटार मेकॅनिकचे काम शिकण्यासाठी सिरसावरून फतेहाबाद येथे आत्याच्या घरी आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते. पण मुलीच्या वडिलांनी कोणतीही तडजोड केली नाही. पोलिसांचे म्हणणे आहे कि, तरुण सध्या फरार आहे, त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरु असून लवकरच त्याला तुरुंगात टाकले जाईल.

त्याचबरोबर फतेहाबादचे डीएसपी दलजित बेनीवाल म्हणतात की, फतेहाबादच्या शिव नगर भागात 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मामेभाऊ सुट्टीमुळे आत्याच्या घरी आला होता. यादरम्यान, त्याने मुलीवर बलात्कार केला. घरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याने हा खुलासा झाला. आता पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल.