संतापजनक ! ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन निर्घुण हत्या

लखनौ : वृत्तसंस्था – अलीगडमधील ३ वर्षाच्या मुलीच्या निर्घुण हत्येची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशच्याच हमीरपूरमध्ये एका ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घुण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना हमीरपूर येथील कुरारा परिसरात घडली. येथील एका कुटुंबातील सदस्य गेल्या दोन महिन्यांपासून मजुरीच्या कामामुळे कानपूरमध्ये गेले आहेत. त्यांची ११ वर्षाची मुलगी घरात एकटीच रहात होती. शुक्रवारी रात्री काही गुंड घरात घुसले. त्यांनी मुलीला उचलून नेले. त्यानंतर त्या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. तिचा मृतदेह शनिवारी गावाच्या स्मशानभूमीत मिळाला.

काही गावकऱ्यांनी मुलीची ओळख पटवली व तिच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना याची माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संतप्त झालेल्या गावकऱ्यानी पोलिसांना मृतदेह ताब्यात घेऊ दिला नाही. तिच्या कुटुंबियांनी सीबीआयच्या चौकशीची मागणी केली. अखेर पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर गावकरी शांत झाले व त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पाच विशेष पथकाची स्थापना केली असल्याची माहिती दिली.