ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या एका तरुणीवर बलात्कार, आरोपीची ओळख पटली पण…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्लीच्या गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुग्रामच्या सेक्टर 44 मधील फोर्टिस रुग्णालयात एका 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला असून तरुणी रुग्णालयात टीबीशी झुंज देत होती. तिची प्रकृती जास्त खालावल्यामुळे तरुणीला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. तरुणी व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

दरम्यान घटनेसंदर्भात पोलिसांनी माहिती दिली की, जेव्हा तरुणीला मंगळवारी शुद्ध आली तेव्हा तरुणीने घडलेल्या प्रकाराबाबत वडिलांना सांगितले. तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार एका कागदावर लिहून वडिलांना सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदविली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 21 ते 27 ऑक्टोबर दरम्यानची आहे. 21 ऑक्टोबर रोजी तरुणीला रुग्णालयात दाखल केले गेले होते. 27 ऑक्टोबर रोजी तिला शुद्ध आली. सध्या तरुणीवर त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडित तरुणी ही महेंद्रगढ येथील रहिवासी आहे. तिला श्वास घेण्यात अडचण येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार तिच्यावर टीबीचे उपचार सुरू आहेत. गुरुग्रामच्या असिस्टेंट पोलीस कमिश्नर उषा कुंदू यांनी सांगितले की, पीडित तरुणीचे वडील पीडितेला भेटायला गेले असता तिने बलात्कार झाल्याचा प्रसंग एका कागदावर लिहून वडिलांना सांगितला. त्या म्हणाल्या की रुग्णालयाने याबाबतचा तपास केला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आयपीसी कलम 376 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी सांगितले की आरोपीची ओळख पटविण्यात आली आहे, परंतु अद्याप त्याला अटक करण्यात आलेले नाही.

You might also like