धक्कादायक ! नोकरीच्या आमिषाने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अल्पवयीन मुलाला नोकरीचे आमिष दाखवून त्याचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दवाखान्यात काम करणाऱ्या सचिन उत्तमराव अमोलिक (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध ‘पोस्को’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील एका खासगी दवाखान्यात कामाला असलेल्या सचिन अमोलिक काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास बेलापूर येथील एका अल्पवयीन मुलाला नोकरी देण्याच्या बहाण्याने श्रीरामपूरला बोलावले व काही टेस्ट कराव्या लागतील, असे सांगून लैंगिक छळ केला. याप्रकरणी फिर्यादी मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार अमोलिक याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ८/१२ प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३११/२०१९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत.