अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षाची सक्तमजुरी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली. अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत एल. आनेकर यांनी ही शिक्षा सुनावली. या प्रकरणाची न्यायालयत केवळ सहा दिवस सुनावणीचे कामकाज झाले. सहा दिवस कामकाज होऊन आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. मनोज रहिहर शुक्ला (वय-35 रा. भरसाळ, ता. सहेजवा, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

घटनेची हकीकत अशी की, पीडित मुलीचे आई-वडील हे नेपाळ येथील चमारा चौतारा येथील रहिवासी असून ते रोजगाराच्या शोधात पारनेर येथे आले होते. पीडीत मुलीचे वडील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात. हे कुटुंब एका मळ्यामध्ये खोलीत राहते. घटनेच्या दिवशी म्हणजेच 11 मे 2017 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास पीडीत मुलगी घराबाहेर अंगणात बसली होती. त्यावेळी चाळीत राहणारा आरोपी शुक्ला याने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. मुलगी बाहेर दिसत नसल्याने तिच्या आईने तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. पीडित मुलगी आरोपीच्या खोलीत आढळून आली.

पीडीत मुलीने तिच्यासोबत घडलेली घटना आईला सांगितली. तिच्या आईने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक आर.डी पवार यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात पीडित मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल महत्त्वाची ठरली.

या खटल्याचे प्रत्यक्ष काम सुरु झाल्यापासून केवळ 2 महिने 7 दिवसामध्ये लागला. त्यापैकी केवळ सहा दिवस सुनावणीचे कामकाज झाले. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अनिल सरोदे यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी सहायक पोलीस फौजदार लक्ष्मण काशिद यांनी सरकारी वकीलांना मदत केली.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/