धक्कादायक : मॅगी तयार करण्यास सांगून पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे/हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन – घरामध्ये अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला घरात एकटी गाठत तिला मॅगी तयार करण्यास सांगून आतून दरवाजा बंद करुन तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी राजेश्वर उर्फ राजा नरहरी भुसावर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च 2018 मध्ये हिंजवडीत घडली होती. याप्रकरणी पीडित 15 वर्षीय मुलीने फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून आरोपी तिच्या घरात घुसला होता. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत त्याने पीडित मुलीला मॅगी तयार करुन देण्यास सांगितले. पीडित मुलगी मॅगी करण्यासाठी किचनमध्ये गेली असता त्याने घराचा दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर त्याने मुलीला या प्रकाराबाबत कुठे वाच्चता केल्यास आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडित मुलीने मोशी येथील चैतन्य महिला मंडळाच्या संस्थापिका ज्योती पठाणीया यांना माहिती दिली त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. ज्योती पठाणीया यांनी हिंजवडी पोलिसांकडे पत्रव्यवहार केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी पीडीत मुलीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे मात्र, अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/