बलात्कार पिडीतेला मोबाइल देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर ‘रेप’ करणाऱ्यास ‘जन्मठेप’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईल परत देण्याच्या बहाण्याने पीडितेला एका ठिकाणी बोलवून तिच्यावर परत बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जालना येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून संजय हावरे असं शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी संजय हावरे हा जालना जिल्हातील असून त्याने ९ जुलै २०१५ रोजी बलात्कार पीडितेला तिचा मोबाईल परत देण्याच्या बहाण्याने अंबड चौफुली येथे बोलवले होते. त्यावेळी मोबाईल परत घेण्यास आलेल्या बलात्कार पीडितेला संजय हावरे याने बळजबरीने आपल्या मोटार सायकलवर बसवून जंगलात नेऊन तिच्यावर परत बलात्कार केला होता.

याप्रकरणात जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास अधिकारी सहाय्य्क पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी न्यायालायने १० साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलगी, तिचे आई-वडील, डॉक्टर, इतरांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. यात न्यायालयाने साक्ष-पुरावे आणि युक्तिवादाच्या आधारे आरोपी संजय हावरे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.