धक्कादायक ! न्यायालयात सुनावणीसाठी निघालेल्या बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबादची बलात्काराची घटना ताजी असताना देशामध्ये आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बलात्कार प्रकरणातील पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न उन्नावमध्ये घडला आहे. याबाबतची माहिती पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना दिली. पीडितेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे तातडीने पीडितेला लखनऊ रुग्णालयात हलवल्याची माहिती मिळाली आहे.

पीडितेला जाळल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. ज्यातील दोघांवर बलात्काराचा आरोप आहे. बलात्कार प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली होती मात्र काही दिवसांपूर्वीच त्याला जामिन मिळाला होता. आज सकाळी पीडित तरुणी सुनावणीसाठी न्यायालयात जात होती त्यावेळी तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये तरुणी 60 ते 70 टक्के भाजली आहे.

मार्च महिन्यामध्ये पीडितेने दोघांविरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती तसेच बलात्कार करून पीडितेच्या चित्रीकरण करण्याचा देखील प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले होते. याबाबत पोलिसांनी एकाला अटक केली होती आणि एक आरोपी फरार होता. अटक केलेल्याला जामिन मिळाला होता. धक्कादायक बाब म्हणजे आज ज्यावेळी पीडितेला जाळण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी फरार आरोप देखील तेथे उपस्थित होता. पोलिसांनी त्याला अटक करण्यात यश मिळवले आहे.

याबाबतची अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रांत वीर म्हणाले, आम्हाला सकाळी याबाबतच्या प्रकाराची माहिती मिळाली तसेच पीडितेने स्वतः आरोपींची नावे आम्हाला सांगितली. त्यानंतर तिघांना अटक केली असून अद्याप दोघांचा शोध सुरु असल्याची माहिती यावेळी पोलीस निरीक्षकांनी दिली.