जळगाव : 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या तरूणाला मरेपर्यंत जन्मठेप

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन –  चॉकलेट देण्याच्या अमिषाने घरात बोलावून तीन वर्षाच्या मुलीवर लैगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने बुधवारी (दि.17) मरेपर्यंत जन्मठेप व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश आर.जे. कटारिया यांनी हा निकाल दिला.

किशोर उर्फ पिंटू निंबा भोई (वय 38 ,रा. बेडरपुरा, नगरदेवळा, ता.पाचोरा) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, 26 मार्च 2019 रोजी दुपारी 2 वाजता पीडित बालिका गल्लीत खेळत होती. त्यावेळी आरोपीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पीडितेला घरात बोलावून अत्याचार केला. याचवेळी पीडितेचा रडण्याचा आवाज आल्याने तिची आई धावून आली असता आरोपीचा घराचा दरवाजा बंद होता. आवाज देऊनही तो दरवाजा उघडत नव्हता. आजुबाजुच्या लोकांनी धाव घेऊन आवाज दिला असता त्याने अर्धनग्न अवस्थेत दरवाजा उघडून पळ काढला होता. त्यानंतर पीडित बालिकेने आईजवळ घटनाक्रम कथन केला. त्यानंतर आईने त्याच स्थितीत पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती. त्यावरून बाललैगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियमनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

हा खटला सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात चालला. सरकारतर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सरकारी वकीलांनी साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्यानंतर 3 वर्ष वयाच्या चिमुरडीसोबत झालेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असेच आहे, त्यामुळे समाजातील अशा प्रवृत्ती ठेचण्यासाठी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असा प्रभावी युक्तीवाद करुन काही पुरावे न्यायालयासमोर सादर केले. यात पीडितेची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली. त्यामुळे न्यायालयाने किशोर भोई याला दोषी धरुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.