शिरुर तालुक्यात 150 रुपयांत रॅपिड अँटिजेन टेस्ट; राव लक्ष्मी फाउंडेशनचा उपक्रम

शिक्रापुर : शिरूर तालुक्याच्या मांडवगण फराटा येथील यश इन कॉम्प्लेक्स तसेच शिक्रापूर येथील माऊली नाथ हॉस्पिटल येथे राव लक्ष्मी फांउडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सवलतीच्या दरात रॅपिड अँटिजेन टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार व माऊली नाथ हॉस्पिटलचे डॉ. पवन सोनवणे यांच्या हस्ते या सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.

यापूर्वी सरकारी दवाखान्यात रुग्णांची मोफत चाचणी करण्यात येत होती मात्र रॅपिड अँटिजेन टेस्ट किटचा तुटवटा निर्माण झाल्याने रुग्णांना खासगी लॅबमध्ये तपासणी करावी लागत होती. यासाठी रुग्णांना पाचशे ते आठशे रुपये मोजावे लागत होते. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांचा विचार करता त्यांना हा खर्च आवाक्याबाहेर आहे. त्यामुळेच आमदार अशोक पवार, सुजाता पवार यांनी प्रयत्न करून माऊली नाथ हॉस्पिटल घ्या मदतीने हे केंद्र चालू केले.

याप्रसंगी रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईसचेअरमन बाबासाहेब फराटे, संचालक दत्तात्रय फराटे, सरपंच शिवाजी कदम, मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते, गणपतराव फराटे, संभाजी फराटे, धनंजय फराटे, दत्तात्रय कदम, अंकुश जगताप आदी उपस्थित होते.