रॅपर अन् सिंगर ‘कार्डी बी’नं शूज प्रमोट करताना दिली दुर्गामातेप्रमाणे पोज, सोशलवर भडकले लोक ! नंतर मागितली माफी

पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेन रॅपर आणि सिंगर कार्डी बी (Cardi B) नेहमीच काही ना काही कारणामुळं चर्चेत येत असते. अनेकदा ती विवादामुळंही चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा कार्डी वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. तिच्या एका फोटोमुळं वाद निर्माण झाला आहे. परंतु यावरून कार्डीनं माफीही मागितली आहे.

कार्डीनं सोशलवरून एक फोटो शेअर केला होता. ज्यात तिनं हिंदू देवी दुर्गा मातेप्रमाणे पोज दिली होती. एका फूटवेअर मॅगेझिनच्या कव्हर पेजसाठी तिनं ही पोज दिली होती. दुर्गा देवीच्या अवताराप्रमाणे तीही 8 हातांची दिसत होती. इतकंच नाही तर हा फोटो क्लिक करताना तिच्या हातात एक शूजही दिसत होता आणि लाल रंगाचा ग्लॅमरस ड्रेसही तिनं परिधान केला होता.

https://twitter.com/wotermelonsugrx/status/1326414868120018945?s=20

जेव्हा कार्डीचा हा फोटो समोर आला तेव्हा चाहतेही खूप नाराज झाले होते. काहींनी तर असंही म्हटलं की, कार्डीनं दुर्गामातेचा अपमान केला आहे. तिनं दिलेली पोज चुकीची असल्याचं अनेकांनी म्हटलं. अशा प्रकारे कार्डीनं प्रेझेंट होणं अनेक नेटकऱ्यांना आवडलं नाही. अनेकांनी ही इमेज आणि दुर्गामातेसोबत तुलना करण्यासाठी कार्डीवर टीकादेखील केली. यानंतर कार्डीच्या नावाचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करताना दिसत आहे.

यानंतर कार्डीनं तिच्या इंस्टा स्टोरीला माफी मागतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. कार्डी म्हणाली, मित्रांनो मला माफ करा, माझा हेतू एखाद्या धर्माचा किंवा संस्कृतीचा अपमान करण्याचा किंवा त्यांच्या भावना दुखावण्याचा नव्हता. मी माझा भूतकाळ तर बदलू शकत नाही, परंतु भविष्यात नक्की काळजी घेईन आणि चांगला रिसर्च करेन. लव्ह यू मित्रांनो.