प्रसिद्ध पॉप सिंगरचा गोळ्या घालून खून

लॉस एंजेलिस : वृत्तसंस्था – अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप सिंगर असलेल्या पॉप स्मोक (वय-20) या गायकाचा त्याच्या घरात घुसून गोळ्या झाडून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञात मारेकऱ्याने स्मोक यांच्यावर बेछूट गोळीबार करुन त्याचा खून केला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्याने त्याच्यावर गोळ्या घातल्याचे वृत्त आहे.

लॉस एंजेलिस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉप संघ्याकाळी साडेचार वाजता रेडिओवरील शो संपवून घरी आला होता. घरी आल्यावर आराम करण्यासाठी खोलीत गेला. त्यावेळी त्याच्यावर एका अज्ञात व्यक्ती त्याच्या खोलीत चोरी करत होता. त्याला विरोध करत असताना त्या चोरट्याने पॉपवर गोळ्या झाडल्या. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटना घडली त्यावेळी त्याचे कुटुंबीय घरामध्ये उपस्थित होते. मात्र, पॉपच्या खोलीतील भिंती ध्वनीप्रतिरोधक असल्याने त्याच्या ओरडण्याचा आवाज कुटुंबीयांना आला नाही. संध्याकाळी त्याची आई त्याला नाश्ता करण्यासाठी बोलवण्यासाठी गेली असता पॉपचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घरातील सीसीटीव्ही तपासले असता सीसीटीव्ही मध्ये मास्क घातलेल्या व्यक्तीने पॉपवर गोळ्या घातल्या. त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसून येत नसून पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

कोण होता पॉप स्मोक ?
पॉपचं खरं नाव बशर बराक जॅक्सन असे असून त्याला संगीत क्षेत्रात पॉप स्मोक या टोपण नावाने ओळखले जाते. किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनला आदर्श मानणारा पॉप 16 वर्षी मीट द वू हे गाऊन पहिल्यांदा प्रकाश झोतात आला होता. त्यानंतर चार वर्षात त्याने वेलकम टू द पार्टी, शेक द रुम, मीट द वू, पार्टी असे अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. संगीत क्षेत्रातील नवा सुपरस्टार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते.