Pune : ‘रसायू कॅन्सर क्लिनिक’च्या निद्रानाशावरील ‘वैयक्तिकृत आयुर्वेदिक रसायन उपचारपद्धतीमुळे’ कर्करोगग्रस्तांच्या जीवनशैलीत ‘गुणात्मक’ बदल, जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कर्करोगग्रस्तांमध्ये निद्रानाशाच्या त्रासामुळे उद्भवणाऱ्या विविध समस्या आणि ढासळणारी जीवनशैलीची गुणवत्ता यावर वैयक्तिकृत आयुर्वेदिक रसायन उपचारपद्धती नुसार उपाय केल्यास रुग्णांमध्ये असलेल्या चिंता व नैराश्याचे प्रमाण कमी होते तसेच निद्रा व जीवनशैलीची गुणवत्ता वधारते असा निष्कर्ष एका अभ्यासातून निघाला आहे.

कर्करोगावरील उपचारांच्या क्षेत्रात प्रदीर्घकाळ संशोधन करणाऱ्या वैद्य योगेश बेंडाळे यांच्या रसायू कॅन्सर क्लिनिक या संस्थेने हे निष्कर्ष नोंदविले असून ते नुकतेच कोरियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलाॅजीतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय कॅन्सर परिषदेमध्ये वैद्य. योगेश बेंडाळे यांनी सादर केले. अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलाॅजिस्ट या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. रसायूने केलेल्या संशोधनातील निष्कर्षांचे सादरीकरण आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ते स्वीकारले जाण्याची ही गेल्या तीन महिन्यातील दुसरी घटना आहे. वैद्य योगेश बेंडाळे, वैद्य विनीता बेंडाळे, वैद्य अविनाश कदम, वैद्य पूनम बिरारी-गवांदे आणि वैद्य आनंदराव पाटील यांनी या संशोधनात सहभाग घेतला.

वैद्य योगेश बेंडाळे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, रसायू कॅन्सर क्लिनिक, म्हणाले, “कर्करोगाच्या प्रगत टप्प्यातील रुग्णांची जीवनशैलीची गुणवत्ता ही जागतिक पातळीवरील संशोधनात महत्त्वाची मानले जात आहे. भारतामध्ये, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीनुसार, ७५ टक्क्यांहून अधिक कॅन्सरचे रुग्ण हे प्रगत टप्प्यातील आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येत असलेल्या रुग्णांच्या दृष्टीने त्यांच्या जीवनशैली मध्ये गुणात्मक बदल आणण्यासाठी रसायूतर्फे संशोधन करण्यात आले आहे. कॅन्सरग्रस्त असलेल्या सुमारे ३० ते ७५ टक्के रुग्णांमध्ये निद्रानाश, चिंता, नैराश्याची लक्षणे आढळतात. त्यामुळे कर्करोगावरील उपचाराला प्रतिसाद देण्याच्या प्रक्रियेत हा मोठा अडथळा असतो. आयुर्वेदामध्ये कर्करोगासह या अन्य लक्षणांवर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत.”

निद्रानाशामुळे कर्करोगग्रस्तांवर होणारे दुष्परिणाम

● सर्वसाधारणपणे उपचारांना मिळणाऱ्या प्रतिसादावर नकारात्मक परिणाम
● कर्करोगग्रस्तांची परिस्थिती खालावते
● कर्करोग कमी वेळेत पुन्हा होण्याची (पुनरावृत्तीची) शक्यता बळावते
● कर्करोगामुळे मृत्यू होण्याची शक्यता बळावते
● लक्षणांमुळे होणाऱ्या नैराश्य, त्रासात वाढ

अभ्यासाची पद्धत

● केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी घेतल्यानंतर दोन ते बारा महिन्यांच्या कालावधीतील ३० कॅन्सरग्रस्तांचा समावेश
● अभ्यासामध्ये निद्रानाशाचा त्रास होत असलेल्या पुरुष व महिला रुग्णांचा समावेश होता त्यापैकी बहुतांश महिला रुग्ण होत्या
● अभ्यासात समावेश केलेल्या ३० रुग्णांवर ९० व्या दिवसापर्यंत वैयक्तिकृत आयुर्वेदिक रसायन उपचारपद्धती सुरू ठेवली
● पहिल्या दिवसापासून ९० व्या दिवसापर्यंतच्या विविध निकषांवरील नोंदी घेतल्या गेल्या
● अभ्यासामध्ये मुख्यतः स्तनांचा कर्करोग असलेल्या रुग्णांसह अन्ननलीकेचा कर्करोग असलेले रुग्ण, तोंडाचा कर्करोग असलेले रुग्ण, अंडाशयाचा कर्करोग असलेले रुग्ण आणि आतड्यांचा कर्करोग असलेया रूग्णांचा समावेश होता
● पिट्सबर्ग स्लीप क्वालिटी इंडेक्स सारख्या जागतिक मापदंडाचा वापर करून झोपेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केले गेले, त्याच बरोबर चिंता आणि नैराश्याचे मूल्यांकन हॉस्पिटल अँक्सिटी डिप्रेशन स्केल या जागतिक मापदंडाचा वापर करून केले गेले

अभ्यासात सहभागी झालेल्या कॅन्सरच्या रुग्णांवर वैयक्तिकृत आयुर्वेदिक रसायन उपचारपद्धती नुसार उपचार केल्यानंतर पुढील गोष्टींवर होणारा परिणाम अभ्यासला गेला-

● निद्रा गुणवत्ता
● चिंता, ताण-तणाव
● नैराश्य
● जीवनशैलीची गुणवत्ता

निष्कर्ष

● निद्रा गुणवत्ता वधारली
● चिंता व नैराश्य कमी झाले
● जीवनशैलीची गुणवत्ता वधारली
● उपचारपद्धती सुरक्षित व परिणामकारक असल्याचे दिसून आले
● हिप्नाॅटिक्स व अँक्झियोलिटिक्ससाठी पात्र नसलेल्या रुग्णांमध्ये या उपचार पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो