काही पण ! आपले ‘शौक’ पूर्ण करण्यासाठी लोकांची पोलीस हेल्पलाइनवर चक्क ‘या’ गोष्टींची मागणी

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे लोकांच्या मदतीसाठी उत्तर प्रदेशमधील  सरकारने सुरू केलेल्या ‘हेल्पलाइन’चा आवश्यक वस्तूंसाठी उपयोग होत आहेच, मात्र काही लोक आपले ‘शौक’ पूर्ण करण्यासाठी विविध वस्तूंची मागणी करीत आहेत. हेल्पलाइन नंबरवर काही घाबरलेल्या नागरिकांचे औषधांसाठी फोन येत आहेत. तर हेल्पलाइनवर रसगुल्ला, समोसा इतकचे नव्हे तर पान, गुटख्याची मागणी करणारे फोन कॉल्स येत आहेत, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

औषधांसारख्या आवश्यक वस्तूंसाठी 1076 या हेल्पलाइन क्रमांकावर गरजू लोकांचे दूरध्वनी येत आहेत.  पण काहीजण रसगुल्ला, समोसा अशा पदार्थाची आणि काहीजण तर पान व गुटख्यासारख्या वस्तूंचीही मागणी करीत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या 112 या हेल्पलाइन क्रमांकावर एक विचित्र कॉल आला. एका वयोवृद्ध व्यक्तीने रसगुल्ल्यांसाठी ‘तातडीची विनंती’ केली. ही चेष्टा असावी असे फोन घेणार्‍या पोलिसाला वाटले. मात्र एका स्वयंसेवकाने लखनऊच्या हजरतंगज भागात हे रसगुल्ले नेऊन दिले, तेव्हा 80 वर्षांच्या एका इसमाला खरोखरच त्यांची गरज होती असे लक्षात आले. तो मधुमेहाचा रुग्ण होता आणि त्याची रक्तातील शर्करेची पातळी अतिशय कमी झाली होती.

हेल्पलाइन नंबर 1076 वर राम रतन पाल यांनी फोन केला. त्यांना उच्च रक्तदाबाचा आजार आहे. पण औषधे संपल्याने ते अतिशय घाबरलेले होते. यावेळी आम्ही नियंत्रण कक्षातून तातडीने पावले उचलून लखनऊमध्ये त्यांच्या घरी औषधे पोहोच केली. गौतम बु्द्ध नगरमधील शंकर सिंग यांनी आवश्यक अन्नधान्यची मागणी केली होती. त्यांनाही ती घरपोच देण्यात आली. सीएम हेल्पलाइनवर असे अनेक फोन कॉल्स येत आहेत. अशी आम्ही जवळपास 1 लाख नागरिकांना मदत केलीय. पोलीस रिस्पॉन्स व्हेइकल उपयोग करण्यात येत आहे. यासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.