Rashifal 2021 : नोकरी-व्यापारासाठी कसे असेल 2021 वर्ष ? ‘या’ 6 राशींना भरपूर फायदा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नोकरी, करियर आणि व्यापाराच्या दृष्टीने 2020 लोकांसाठी निराशाजनक ठरले आहे. आता 2021 येण्यास थोडा कालावधी शिल्लक राहिला आहे. नव्या वर्षासोबत लोक जीवनात नवीन यश आणि चांगल्या संधी मिळण्याची अपेक्षा करत आहेत. ज्योतिषतज्ज्ञ सांगतात की, 2021 वर्ष नोकरी आणि व्यापाराच्या बाबतीत कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशीवाल्यांसाठी खुप लाभदायक ठरू शकते. 2021 मध्ये सर्व राशींची स्थिती कशी राहणार आहे ते जाणून घेवूयात.

मेष
नोकरीच्या बाबतीत उत्तम राहील. नोकरीमध्ये मनासारखा लाभ आणि परिवर्तनाचे योग आहेत. व्यापार्‍यांना मे महिन्यापासून लाभ होण्याचे योग आहेत. मात्र, जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान थोडे सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

वृषभ
नोकरीत मेहनतीनेच फायदा होईल. पदोन्नती-बढती मेहनतीवर अवलंबून असेल. जबाबदार्‍या वाढतील. परदेशातून लाभ होऊ शकतो. व्यवसाय वाढेल, नफा होईल. मालमत्ता वाढेल आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतील.

मिथुन
यावर्षी नोकरीत अनावश्यक ताण येऊ शकतो. नोकरी बदलू नका, वरिष्ठ अधिकार्‍यांशी ताळमेळ ठेवा. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू नका. नवीन दुकान किंवा छोट्या-मोठ्या व्यवसायाची योजना सध्या पुढे ढकला. शॉर्टकटद्वारे पैसे कमविणे देखील टाळा.

कर्क
वर्षाच्या सुरूवातीलाच करिअरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मित्राच्या मदतीने हा बदल फायदेशीर ठरेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याबद्दल विचार करू शकता. व्यवसायात हात टाकण्यापूर्वी कृपया हितचिंतकांचे मत जाणून घ्या.

सिंह
यावर्षी नोकरी आणि करिअरच्या बाबतीत मोठा निर्णय घ्याल. नोकरीसाठी दूर किंवा परदेशात जावे लागू शकते. जुन्या व्यवसायाशिवाय काही नवीन कामेही सुरू कराल. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याचे योग आहेत.

कन्या
यावर्षी नोकरीची स्थिती चांगली राहील. नोकरी बदलण्याची जोखीम न घेणे चांगले ठरेल. व्यवसायातील तोटा कमी होईल. कर्जातून मुक्ती मिळेल. खर्च कमी होईल. बँक बॅलन्स वाढेल.

तुळ
खुप मेहनत केल्यावरच नोकरीतील स्थिती सुधारेल. करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची घाई व निष्काळजीपणा करू नका. खूप विचार करून नवीन व्यवसाय सुरू करा. कोणत्याही कामात मोठी गुंतवणूक करण्यास सध्याची योग्य वेळ नाही.

वृश्चिक
यावर्षी नोकरीमध्ये मोठ्या परिवर्तनाचे योग आहेत. चांगल्या संधींची कमतरता भासणार नाही. स्थान परिवर्तनानंतर एखाद्या नवीन व्यवसायाची सुरूवात होईल. व्यवसायाची स्थिती चांगली होईल, समस्या संपतील.

धनू
यावर्षी नोकरी आणि स्थानांतरणासाठी तयार रहा. परदेशात नोकरी किंवा नवीन सुरुवात होऊ शकते. व्यवसायाची स्थिती स्थिर राहील, पैशाची स्थिती चांगली असेल. प्रॉपर्टीच्या बाबतीतही नफा मिळण्याची शक्यता आहे.

मकर
वर्षाच्या सुरूवातीला नोकरीमध्ये मोठे बदल होतील. नोकरीच्या बाबतीत वर्षभर सर्व चांगले राहणार आहे. जबाबदार्‍या वाढतील, पद प्रतिष्ठेचा लाभ होईल. व्यवसायाची स्थिती हळूहळू सुधारेल.

कुंभ
यावर्षी करिअरचे प्लॅनिंग करण्याची गरज आहे. नोकरीत स्थिरता येईल. धनवृद्धीचे योग आहेत. उत्पन्नाचे आणखी स्त्रोत निर्माण होतील. व्यवसायात काही बदल व सुधारणा कराल, जे फायद्याचे ठरतील.

मीन
यावर्षी नोकरी आणि स्थान परिवर्तनाचे योग आहेत. परदेशासंबंधी लाभाची शक्यता आहे. व्यवसायात सुधारणा होईल, पैशाची आणि कर्जाची समस्या दूर होईल.