राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज : मानव कल्याणासाठी कार्यरत ऋषीतुल्य व्यक्तिमत्वं हरपलं – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन   –   राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे विज्ञान व अध्यात्माची सांगड घालत मानव कल्याणासाठी कार्य करणारं ऋषीतुल्यं व्यक्तिमत्वं होते. समाजप्रबोधन, जातीनिर्मुलनाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रउभारणीसाठी मोलाचं योगदान दिलं. ते सोबत नसणं ही राज्याच्या, देशाच्या सामाजिक, आध्यात्मिक चळवळीची मोठी हानी आहे. महाराजांच्या लाखो भक्तांवर आज दु:खाचा डोंगर कोसळला असून आम्ही सर्वजण या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना अभिवादन करुन श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळवलेले मराठवाड्यातील पहिले डॉक्टर होते. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल त्यांनी तुरुंगवास भोगला होता. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी देशाच्या, समाजाच्या, मानवतेच्या कल्याणासाठी अर्पण केलं. त्यांचं कार्य अखंड मानवजातीच्या कल्याणाचं कार्य होतं म्हणूनच ते राष्ट्रसंत ठरले. महाराजांनी दिलेले विचार, केलेलं कार्य पुढं घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.