Beed News : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का, 4 नेत्यांनी बांधलं शिवबंधन

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बीड नगरपालिकेतील काकू नाना विकास आघाडीच्या 4 नगरसेवकांनी शुक्रवारी (दि. 29) शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार क्षीरसागर यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत काका आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने काम करण्याची इच्छा या नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुतण्याचे मतदारसंघासह नगरपालिकेतील वर्चस्व कमी होताना दिसत आहे.

नगरसेवक गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, भैयासाहेब मोरे, रंजित बनसोडे या चार नगरसेवकांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे आमदार क्षीरसागर गटाला मोठा धक्का समजला जात असून ते बॅकफुटवर जात असल्याची चर्चा सुरू आहे.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी काकू नाना विकास आघाडी निर्माण करत स्वतंत्र निवडणूक लढवली होती. यावेळी 20 नगरसेवक निवडून आणत काका नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांना धक्का दिला होता. मात्र त्यानंतर काही नगरसेवकांनी पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती. आज पुन्हा 4 नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने बीड नगरपालिकेत फक्त 10 सदस्य काकू नाना विकास आघाडीकडे राहिले असून काका डॉ भारतभूषण क्षीरसागर यांचे नगरपालिकेतील बळ वाढले आहे.