माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे पुत्र आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजितसिंह यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजितसिंह (वय ८२) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. देशातचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरणसिंह यांचे अजित सिंह हे पूत्र होत.
अजितसिंह यांना २० एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते.  गुरुग्राममधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. फुफ्फुसामध्ये संक्रमण वाढल्यामुळे त्यांची तब्येत खालावत जात होती. त्यानंतर आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चौधरी चरणसिंह यांचा वारसा अजितसिंह यांना मिळाला होता. जाटांचे मोठे नेते म्हणून अजितसिंह यांची ओळख होती. उत्तर प्रदेशातील उत्तर भागात त्यांचे वर्चस्व होते. अजित सिंह हे बागपत लोकसभा मतदारसंघातून ७ वेळा विजयी झाले होते. २००१ ते २००३ मध्ये ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात कृषी मंत्री होते. युपीए सरकारच्या ते नागरी उड्डाण मंत्री होते. २०१९ मध्ये त्यांनी मुजफ्फनगर येथून निवडणुक लढविली होती. परंतु त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

अजितसिंह यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९३९ रोजी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये झाला होता. लखनौ विश्वविद्यापीठ आणि आयआयटी खरगपूर मधून त्यांनी पदवी संपादन केली होती. त्यानंतर १७ वर्षे ते अमेरिकेत काम करीत होते. १९८० मध्ये ते आपले वडिल चरणसिंह यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय लोकदलात सक्रीय झाले. अजितसिंह यांचे पुत्र जयंत चौधरी हे मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते.
विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजितसिंह हे केंद्रीय उद्योगमंत्री होते.

त्यानंतर ते काँग्रेसचे सदस्य बनले. पी़ व्ही़ नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते अन्न मंत्री होते. काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्यावरही त्यांनी एक वर्षानंतर राजीनामा देऊन स्वतंत्र भारतीय किसान कामगार पार्टीची स्थापना केली होती. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना अपयश आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय लोकदलाची स्थापना केली. २००१ मध्ये त्यांनी भाजपशी युती केली होती.

केंद्रात अनेक पक्षांशी युती करणार्‍या अजितसिंह यांनी उत्तर प्रदेशातही कधी बसपा तर कधी मुलायमसिंह यांच्याशी युती केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा २००९ मध्ये भाजपप्रणित एनडीएमध्ये प्रवेश केला होता.