‘स्वाभिमानी’कडून वीज कनेक्शन तोडण्याविरोधात पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वीज कनेक्शन तोडण्याच्या कारणावरून पुणे-बेंगलोर या राष्ट्रीय महामार्ग येथे सर्व पक्षीयांनी चक्काजाम आंदोलन केले. मात्र त्या आंदोलनात भाजप पक्षाचा सहभाग नव्हता. वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणकडून कनेक्शन तोडले जात असल्यामुले शुक्रवारी दुपारी हे आंदोलन करण्यात आले.

तर, पंचगंगा नदीच्या पुलावर दर्ग्यासमोर एक तासाच्या कालावधीत पुणे- बंगलोर महामार्ग दोन्ही बाजूंकडून बंद करण्यात आला. महामार्गावर वाहनांच्या २५ किलोमीटरहून जास्त पर्यंत रांगा लागल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह वीज बिलविरोधी कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशन, माकप, जनता दल, किसान सभा, आप, जनसुराज्य, शिवसेना, राष्ट्रवादी, निवृत्त वीज कर्मचारी संघटना अशा अनेक पक्ष आणि संघटनेने या चक्काजाम आंदोलनात सहभाग घेतला होता. भरदुपारी साधारण एक च्या दरम्यान असा तासभर उन्हात हे आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलनात विक्रांत पाटील किणीकर, प्रताप होगाडे, उदय नारकर, संजयबाबा घाटगे, प्रा. जालंदर पाटील, यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

तसेच, या आंदोलनावरून सांगली- इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा येथेही स्वाभिमानीच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन झाले. तर उंब्रज येथे महावितरणच्या कार्यालयाबाहेर पाटण- पंढरपूर हा राज्य मार्ग रोखून धरला होता. या आंदोलनात विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना अरेरावी करू नये, अशी समजही दिली आहे.