FIICC ने प्रतिष्ठेच्या पुरस्काराने रतन टाटा यांना केले सन्मानित

जेरुसलेम/दुबई : पोलिसनामा ऑनलाईन – फेडरेशन ऑफ इंडो इस्त्रायल चेंबर ऑफ कॉमर्स (एफआय आयसीसी)चा प्रतिष्ठेच्या असलेल्या पुरस्काराने ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आले. एका व्हर्च्युअल कार्यक्रमात ग्लोबल व्हिजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस ऍण्ड पीस हा पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला आहे. एकता, शांती आणि स्थिरता यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. दरम्यान, या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आभासी पद्धतीने उपस्थित होते.

इस्त्रायलबाबत रतन टाटा यांनी कायम भक्कम पाठिंबा देत भारताचा सन्मान कायम राखत त्याला वैश्विक पातळीवर पुढे नेण्याबाबत त्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. एकता,शांतता आणि स्थैर्य यांचे प्रतीक असलेल्या टाटा यांचा भारत, इस्त्रायल आणि संयुक्त अरब अमिराती येथील उद्योग जगतामध्ये आदर केला जातो. म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली गेली आहे, संघटनेचे अध्यक्ष गुल कृपलानी यांनी सांगितले.

या कार्यक्रमामध्ये बोलताना टाटा यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भारत आणि इस्त्रायल या दोन्ही देशांमध्ये सहकार्य असण्याची गरज प्रतिपादित करतानाच त्यांनी येथील उद्योगांनी एकमेकांना मदत केल्यास निर्यात वाढू शकेल, याकडे लक्ष वेधले.