‘शहिद’ दर्जा दिल्याशिवाय हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास ‘विरोध’ ‘सीकर’मध्ये आंदोलन

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – दिल्लीतील हिंसाचारात आपले प्राण गमावणारे हेड काँस्टेबल रतनलाल यांना शहीद दर्जा दिल्याशिवाय त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. राजस्थानमधील सीकर या त्यांच्या गावात गावकऱ्यांनी त्यांचे पार्थिव रस्त्यावर एका गाडीवर ठेवून धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

दिल्लीत झालेल्या हिंसाचारात गोकुळनगर येथे हेड काँस्टेबल रतनलाल यांचा मृत्यु झाला होता. सुरुवातीला आंदोलकांच्या दगडफेकीत जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येत होते. गोकुळपुरी भागात हिंसाचार सुरु झाल्यावर रतनलाल हे लोकांना हटविण्यासाठी तेथे पोहचले. तेव्हा लोकांनी पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. त्यात त्यांचा मृत्यु झाला होता. शवविच्छेदनात त्यांना गोळी लागल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव राजस्थानमधील सीकर या मुळ गावी आणण्यात आले.

अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव एका गाडीवर ठेवण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य चौकात गाडी आल्यानंतर अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांनी तेथेच गाडी थांबवून आंदोलन करण्यास सुरुवात केली. रतनलाल हे लोकांच्या दगडाने नाही तर गोळी लागून शहीद झाले. त्यांना शहीद दर्जा दिल्याशिवाय त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, असे लोकांनी सांगितले आहे