आता N-95 Mask मिळणार ‘इतक्या’ रुपयांपर्यंत, दुपदरी आणि तीनपदरी मास्क 4 रुपयांना !

मंबई : पोलीसनामा ऑनलईन – कोरोनाची (Covid-19) साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात आता एन 95 मास्क (N-95 Mask) 19 ते 49 रुपयांपर्यंत तर दु-पदरी आणि तीन पदरी मास्क 3 ते 4 रुपयांना मिळणार आहे. मंगळवारी याबाबत राज्य शासनानं शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

विविध दर्जाच्या मास्कची विहित केलेली अधिकतम विक्री मूल्य मर्यादा ही साथरोग कायदा अंमलात असेपर्यंत लागू राहणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन नागरिकांना मास्क आणि सॅनिटायजरचा (sanitizer) वापर करण्याचं आवाहन करत आहे. याशिवाय मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील करत आहे. त्यामुळं मास्कच्या किंमती सामान्यांना परवडणाऱ्या हव्यात यासाठी घेतलेल्या पुढाकाराला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मान्यता दिल्याचं आरोग्यमत्र्यांनी सांगितलं.

हँड सॅनिटायजर (hand sanitizer) आणि मास्क याच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यानं त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत असल्याचं निर्दशनास आलं. त्यानुसार सॅनिटायजर व मास्कचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं दर निश्चित करण्यापूर्वी उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली. उत्पादक, पुरवठादार व वितरक यांचं उत्पादन क्षेत्र, कार्यालय, गोदाम यांना प्रत्यक्ष भेट दिली तसंच उत्पादित मालाच्या उत्पादनाचा खर्च व त्याची नक्त किंमत परिव्यय लेखा परीक्षक यांच्या सहाय्यानं निर्धारीत केली जाते.

– हे अधिकतम विक्री मूल्य राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेते यांना लागू राहिल.
– या प्रकरणी काही तक्रार उद्भवल्यास राज्य स्तरावर आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व जिल्हा स्तरावर, जिल्हाधिकारी हे तक्रार निवारण्यासाठी सक्षम प्राधिकारी असतील.
– राज्यातील मास्कची आवश्यकता लक्षात घेता उत्पादकानं राज्यात उत्पादित केलेला व राज्यात आवश्यक असलेला माल विहित दरानं उपलब्ध करून देणं आवश्यक राहिल.

खासगी रग्णालयांसाठी महत्त्वाचं –

रुग्ण सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील शासकीय आणि खासगी रुग्णालये, नर्सिंग होम ( nursing home), कोविड केअर सेंटर (Covid Care Center), डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल इत्यादींना मास्कचा पुरवठा करताना मास्कच्या विहित अधिकतम विक्री मूल्य मर्यादेच्या 70 टक्के दरानं उपलब्ध करून देणं आवश्यक राहिल. खासगी रुग्णालयांनी उपरोक्त दरानं मास्कची खरेदी केल्यांनतर खरेदी किंमतीच्या 110 टक्के पेक्षा जास्त रक्कम रुग्णांकडून आकारता येणार नाही असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.