दिलासादायक ! मुंबईत :कोरोना’मुक्तांचा दर आला 53 टक्क्यांवर

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या मुंबईतील रुग्णवाढीचा वेग कमी होत आहे. कोरोनामुक्तीचा दर 53 टक्क्यांवर पोहोचल्याने काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. मागील 24 तासांत 38 रुग्णांचा मृत्यू झाला असून, यापूर्वीचे 82 मृत्यू समाविष्ट केल्यामुळे मृतांचा आकडा 120 ने वाढला. त्यामुळे मृत्यूचा दरही 5.6 वर पोहोचला आहे.

मुंबईतील कोरोनामुक्तीचा दर 53 टक्के झाला आहे. सध्या 28 हजार 653 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्तीचा दर 53 टक्के झालेला असला तरी, मृत्यूदरही वाढला आहे. 48 तासांत 38 मृत्यूची नोंद झाली. मात्र, यापूर्वीचे तब्बल 82 कोरोनामृत्यू समाविष्ट केल्यामुळे मृतांची संख्या 3 हजार 962 वर पोहोचली आहे.

त्यामुळे मुंबईतील मृत्यूचा दर 5.6 टक्क्यांवर गेला आहे. नोंद झालेल्या 120 मृतांपैकी 74 जणांचे वय 60 वर्षांवरील होते. तर 38 रुग्ण हे 40 ते 60 वर्षांदरम्यानचे होते. दुसरीकडे जिल्ह्यात बुधवारी 1 हजार 182 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या आता 24 हजार 674 वर पोहोचली आहे. नवी मुंबई शहरात 321 नवे करोना रुग्ण आढळले आहेत.