पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’ जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील पादचारी पूल गुरुवारी कोसळला. गर्दीच्या वेळी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर ३१ जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर टीका होऊ लागली आहे.

आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करत पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा असा टोला त्यांनी लगावला आहे. ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणे यांनी शिवसेनेर टीका केली आहे.

‘पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा आणि नाइट लाइफसाठी झगडण्यापेक्षा शिवसेनेची सत्ता असलेली महापालिका खरे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही ?’, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. पुढे त्यांनी लिहिलं आहे की, ‘आता पुन्हा तोच आरोप-प्रत्यारोपाचा खेळ आणि ब्रीज ऑडिटची चर्चा सुरु होईल. याचा परिणाम काहीच होणार नाही’.

‘सर्वात श्रीमंत महापालिका पण आयुष्याची काही किंमत नाही’, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. आता काही अधिकाऱ्यांना निलंबित करत किंवा टार्गेट करत कमला मिल्स, एल्फिन्स्टन पूल आणि घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रमाणे चौकशी बसवली जाईल असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.