रुग्ण हक्क संरक्षण कायदा लागू करा या मागणीसाठी गोविंदबाग (बारामती) ते मातोश्री बांद्रा अशी काढणार रथयात्रा

शिरूर : प्रतिनिधी –   अनेक नागरिकांचे लाखो रुपयांचे उपचारांचे बिल माफ करून देण्यासाठी व रुग्णांना त्यांचा मोफत उपचाराचा हक्क – अधिकार मिळवून देण्यासाठी सातत्याने रूग्ण हक्क परिषद कृतिशील असुन फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा लागू करावा या मागणीसाठी रूग्ण हक्क परिषदेच्यावतीने बारामती पुणे ते बांद्रा मुंबई अशी रथ यात्रा १२ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान काढणार असल्याची माहिती रूग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सांगितली. शिरूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शुक्रवार दि.२० रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत माहिती देताना चव्हाण बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव दिपक पवार,विस्वस्त वर्षा काळे,पुणे जिल्हाध्यक्ष गिरीष घाग,जिल्हाकार्याध्यक्ष विकास साठे,शिरूर तालुकाध्यक्ष सविता बोरूडे,उपाध्यक्ष डाॅ.वैशाली साखरे,शहराध्यक्ष अनघा पाठकजी,सारिका वीरशैव,रेश्मा शेख,वैशाली ठुबे,रामचंद्र निंबाळकर,गणपतराव फराटे,डॉ.भारती शिंदे आदि उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षातील परिस्थिती बघता आरोग्य क्षेत्राची दयनीय अवस्था झालेली आहे. याचसाठी रुग्ण हक्क परिषद अनेक नागरिकांचे लाखो रुपयांचे उपचारांचे बिल माफ करून देण्यासाठी व रुग्णांना त्यांचा मोफत उपचाराचा हक्क- अधिकार मिळवून देण्यासाठी सातत्याने कृतिशील असुन फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा लागू झाला तरच येथील सर्व सामान्य नागरिकांची लूट थांबेल.हे पटवून देण्यासाठी रुग्ण हक्क परिषद बारामती जि.पुणे ते बांद्रा मुंबई अशी रथ यात्रा १२ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान काढण्यात येणार असुन प्रवासादरम्यान ठिक ठिकाणी ७५ सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी रूग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सांगितली