सरकारनं ‘या’ कारणामुळं रद्द केले 3 कोटी रेशन कार्ड, तुमचं तर झालं नाही ना ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान म्हणाले की, आधार कार्डचे डिजिटलीकरण व रेशनिंग दरम्यान 3 कोटी रेशनकार्ड बनावट असल्याचे आढळले आहे, त्यामुळे त्यांना रद्द करण्यात आले आहे. लॉकडाऊन कालावधीत गरिबांना प्रधानमंत्री गरीब योजनेंतर्गत प्रत्येक रेशनकार्डधारकांना तीन महिन्यांपर्यंत एक किलो डाळीचे वाटप सरकारने करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेशनकार्ड का रद्द करण्यात आले

सरकारकडून जारी निवेदनात म्हटले आहे की आधार आणि रेशन कार्ड जोडणे आवश्यक आहे. म्हणूनच रेशनकार्ड रद्द केली आहेत. याशिवाय बनावट रेशनकार्ड बनवून, शासकीय योजनेतून खाद्यान्न व इतर वस्तू विनाशुल्क घेण्यात येत होती. अशा प्रकारच्या बनावट शिधापत्रिकादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.

देशातील एकूण 80 कोटी लोकांकडे रेशनकार्ड आहेत. हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित लाभार्थींच्या जसे की कामगार, रोजंदारी कामगार, ब्लू-कॉलर कामगार इत्यादींच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो, ज्यांना देशभरात रोजगाराच्या शोधात वारंवार निवासस्थान बदलावे लागते.

आता काय करावे

रेशनकार्ड रद्द झाल्यावर त्याची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला अन्न पुरवठा विभागात जावे लागेल. तेथे आपले रेशन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे. त्यानंतर आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडला जाईल. यानंतर आपले नवीन रेशन कार्ड तयार केले जाईल.

1 जूनपासून सुरू होत आहे नवीन योजना

1 जून 2020 पासून सरकार ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ ही योजना राबवित आहे. या माध्यमातून जुन्या व नवीन रेशनकार्डधारकांना देशातील कोठेही कोणत्याही रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येणार आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. याला रेशन कार्ड पोर्टेबिलिटी असे म्हटले जात आहे.