‘सरकारी’ शाळेत स्वातंत्र्यवीर ‘सावरकरां’चा फोटो असलेल्या ‘वह्यां’चे वाटप, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित प्राचार्यांच ‘निलंबन’

रतलाम : वृत्तसंस्था – सरकारी शाळेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो असलेल्या वह्यांचे वाटप करण्यात आल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यांला निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील मलवासा येथील सरकारी शाळेत घडला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो असलेल्या वह्यांचे वाटप केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. आर.एन. केरावत असे निलंबित करण्यात आलेल्या प्राचार्यांचे नाव आहे. केरावत यांना 2011 मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मलवासाच्या सरकारी शाळेमध्ये वीर सावरकरांचा फोटो असलेल्या वह्यांचे वाटप करण्यात आले होते. या वह्यांच्या मुखपृष्ठावर सावरकरांचे फोटो, त्यांच्या जीवनातील ठळक वैशिष्ट्यांबरोबर एनजीओ च्या पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र छापण्यात आले होते. शाळेत वह्यांचे वाटप केले त्याचे पदाधिकारी हे भाजप समर्थक आहेत. त्यांनी वह्या वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्याचे फोटो फेसबुकवर अपलोड केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या प्रकरणाची शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर याचा तपास करण्यात आला. यामध्ये शाळेचे प्राचार्य केरावत दोषी आढळले. त्यामुळे उज्जैनचे आयुक्त अजित कुमार यांनी केरावत यांना निलंबित केले. केरावत यांचे निलंबन केल्यानंतर शाळेतील मुलांनी याचा विरोध केला आहे. विद्यार्थ्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करत प्रार्चार्यांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याची मागणी केली. तर सात दिवसात प्राचार्यांवरील निलंबनाची कारवाई रद्द केली नाही तर शहरात आंदोलन करण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

शिक्षण अधिकाऱ्यांनी प्राचार्य केरावत यांना परवानगीशिवाय शाळेत वह्या वाटपांचे आयोजन करण्यामागचे कारण विचारले आहे. तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे केरावत यांनी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत आलो असून यापूढेही काम करत राहणार असल्याचे प्राचार्यांनी म्हटले आहे. जर सरकारला माझा निर्णय चुकीचा वाटत असेल तर पुढील कारवाईसाठी आपण सामोरे जाण्यास तयार असल्याचेही आर.एन. केरावत यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/