1.64 कोटींचे फसवणूक प्रकरण : नाशिक येथील स्थानिक भाजप नेते अन् बिल्डर रत्नाकर पवार यांची येरवडा कारागृहात रवानगी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय करण्याचे व जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी नाशिक येथे भाजपचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक रत्नाकर ज्ञानदेव पवार आणि अशोक अहिरे यांची आज न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
याप्रकरणी मोहद्दीस फारुख बखला यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणात कोंढवा पोलिसांनी यापूर्वी चार जणांना अटक करण्यात आली होती. रत्नाकर पवार व इतरांनी बखला यांना विविध प्रकरणात गुंतवणुक करण्यासाठी तसेच कामगारांचे पगार व इतर कामांसाठी वेळोवेळी १ कोटी ६४ हजार ३८७ रुपये घेतले. त्यापैकी बखला यांनी पवार आणि अहिरे यांना ६३ लाख रुपये दिले होते. त्यांनी प्रत्यक्ष प्रकल्पात पैसे न वापरता त्याचा उपयोग स्वत:साठी केला. रत्नाकर पवार यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर कोंढवा पोलिसांनी त्यांना अटक केली होती. न्यायालयाने सुरुवातीला २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. त्यानंतर आणखी दोन दिवस कोठडीत वाढ केली होती.
त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांच्या समोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर आरोपीच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज केला. त्यावर सरकारी वकील ज्योती वाघमारे यांनी युक्तीवाद केला. फिर्यादीच्या वतीने अॅड. महेश झंवर यांनी सांगितले की, आरोपीवर पूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच गुन्ह्यासंदर्भात महत्वाची कागदपत्रे दाखल करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी उद्या ३० जून रोजी ठेवण्यात आली. रत्नाकर पवार व अशोक अहिरे यांची येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली.