रावण टोळीतील सराईत, फरार गुन्हेगार अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – दरोड्याच्या प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या, रावण साम्राज्य टोळीचा सदस्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तर त्याच्या साथीदारांना वाकड येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक केली होती.

अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव (२६, रा. जाधव वस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी आरोपी अविनाश आणि त्याचे सहा साथीदार वाकड येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच हा दरोड्याचा डाव उधळून लावत सहाजणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले होते. त्यावेळी अविनाश पळून गेला होता.

पोलीस नाईक सावन राठोड यांना माहिती मिळाली की, अविनाश जाधव चिंचवड स्टेशन येथील मल्हार पान दुकानासमोर थांबला आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी परिसरात सापळा रचून अविनाश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो वाकड येथील पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यात फरार असल्याचे सांगितले.

२०१६ साली रावेत येथील हॉटेल झूमइन येथे आरोपी अविनाश आणि त्याचे रावण साम्राज्य टोळीतील दहा साथीदार यांचे हॉटेलचे बिल भरण्यावरून भांडण झाले. त्यातून त्यांनी हॉटेल मध्ये दरोडा टाकला होता. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर २०१७ साली रावण साम्राज्य टोळीने एकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. त्यामध्ये नवले नावाची व्यक्तीमध्ये आली आणि आरोपींच्या हल्ल्यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली. खडकी येथे आरोपी अविनाश याने त्याच्या सहा साथीदारांबरोबर मिळून पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा डाव देखील उधळून लावत त्यांच्याकडून सहा कोयते, एक पिस्तूल आणि एक कार असा ऐवज जप्त केला. याबाबत खडकी पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आरोपी अविनाश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, सावन राठोड, हमेंद्र तातळे, सचिन मोरे, तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली.