परदेशी युवक-युवतींची रेव पार्टी ‘रंगात’, पोलिस पोहचले ‘ढंगात’ अन्…

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये रेव्ह पार्टी करणार्‍या सात परदेशी पुरूष आणि 4 परदेशी वंशाच्या तरूणींसह 11 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. रात्रीच्या वेळी हे लोक परवानगी शिवाय पार्टी करत होते. या लोकांकडून परदेशी ब्रँडची दारू सुद्धा जप्त करण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या पार्टीत अनेक लोक सहभागी होते. प्रकरणाची नोंद करून पोलिस कारवाई करत आहेत.

रात्री उशीरा सूरजपूर पोलीस ठाण्याला माहिती मिळाली की, युपीएसआयडीसी क्षेत्रातील एका घरात काही लोक परवानगी न घेता रेव्ह पार्टी करत आहेत. यानंतर पोलीसांनी ताबडतोब मध्यरात्री छापेमारी मारून 11 परदेशी नागरिकांना अटक केली. पोलिसांचे म्हणणे आहे की, या पार्टीत 50 पेक्षा जास्त लोक सहभागी होते. पोलिसांच्या छापेमारी दरम्यान 11 लोकांना पकडण्यात आले, तर बाकीचे फरार झाले.

पोलिसांनी केला रेव्ह पार्टीचा पर्दाफाश
पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 300 परदेशी ब्रँडची बीयर आणि इंग्रजी दारू व अनेक हुक्के सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, या पार्टीत सहभागी अन्य लोकांचा शोध सुरू आहे. या पार्टीत ड्रग्जचा वापर झाल्याचे बोलले जात आहे.