जळगाव : 4 भावंडाचे रावेर हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात, अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

जळगाव : चार निष्पाप भावंडाचे निर्घृन हत्याकांड जळगावातील रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात घडल्यानंतर संपूर्ण राज्य हादरले होते. या हत्याप्रकणात ठोस पुरावे पोलिसांना सापडले आहेत. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होणार असून राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

शनिवारी दुपारी गृहमंत्री देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि मृत मुलांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. देशमुख यांच्यासोबत भाजप नेते एकनाथ खडसे, आमदार शिरीष चौधरी होते. चौघांपैकी तीन मुलांचे शवविच्छेदन हे शनिवारी सकाळी 11 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आल़े चारही मृत भावंडांवर शनिवारी दुपारी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शोकाकुल भिलाला कुटुंबासह उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.

रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे शुक्रवारी सकाळी एकाच वेळी चार भावंडांचे मृतदेह आढळून आले होते. या चौघांचा खून केल्याचे स्पष्ट झाले. बोरखेडा शिवारात शेख मुस्तफा शेख यासीन यांच्या शेतात अज्ञात मारेकर्‍यांनी सविता (14), राहुल (11), अनिल (8) आणि सुमन उर्फ नाणी भिलाला (5 ) या भावंडांची कुर्‍हाडीने वार करून हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.