Video : गँगस्टर रवी पुजारीला 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी, 2016 मध्ये केला होता गजाली हॉटेलवर गोळीबार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कुलाब्यातील गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर रवी पुजारीला मंगळवारी (दि. 23) मुंबईतील मोक्का कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुन्हे शाखा 21 ऑक्टोबर 2016 मध्ये झालेल्या गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणात रवी पुजारीची चौकशी करत आहेत. याप्रकरणी पुजारीचे सात साथीदार आधीपासूनच तुरुंगात आहेत. पुजारीवर महाराष्ट्रात एकूण 49 खटले दाखल असून, यातील 26 प्रकरणे मोक्काअंतर्गत आहेत. पुजारी हा कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात होता. मुंबईत दाखल असलेल्या महत्त्वाच्या गुन्ह्यात पुजारीचा ताबा मिळविण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करीत होती.

अखेर मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला गझाली हॉटेलमध्ये 2016 साली झालेल्या गोळीबारप्रकरणी पुजारीचा ताबा मिळाला आहे. शनिवारी बंगळुरू न्यायालयाने गुन्हे शाखेस परवानगी दिली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक बंगळुरूला रवाना झाले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मंगळवारी त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.

पुजारीविरुद्ध मुंबईसह कर्नाटक, बंगळुरू, मंगळुरू आणि गुजरात अशा विविध ठिकाणी दीडशेहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गोळीबार, खंडणीसारखे गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत.