राणा-भारतीय वाद चिघळला

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या राठीनगर येथील निवासस्थानासमोर बेशरमाचे झाड लावून साडीचोळीचा अहेर ठेवणाऱ्या आ.रवी राणा समर्थक चार महिलांना गाडगेनगर पोलिसांनी अटक केली. कल्याणनगर-यशोदानगर रस्ता बांधकामाच्या श्रेयावरुन आ. रवी राणा व तुषार भारतीय यांच्यात वाद सुरू आहे. या वादातून राणा समर्थक महिलांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर तैनात असलेल्या वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचाऱ्याला दगड फेकून मारून सदर आंदोलन केले होते.

वंदना कैलास जामनेकर (४१) रा. चैतन्य कॉलनी, मीरा संतोष कोलटक्के (३८) रा. महेंद्र कॉलनी, संगीता रमेश काळबांडे (४५) रा.जयनगर व कोमल श्रीकृष्ण मानापुरे (१९) रा. गितांजली कॉलनी अशी अटक करण्यात आलेल्या राणा समर्थक महिलांची नावे आहेत. कल्याणनगर ते यशोदानगर रस्ता बांधकामाच्या श्रेयाच्या वादातून नगरसेवक तुषार भारतीय यांनी आ. रवी राणा यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानासमोर बेशरमचे झाड लावण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ते आपल्या कार्यकर्त्यांसह बेशरमचे झाड लावण्यासाठी निघाले सुद्धा होते.

परंतु, राजापेठ पोलिसांनी नवाथे चौक परिसरातून तुषार भारतीय यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे तुषार भारतीय आ.राणा यांच्या घरापर्यंत पोहोचूच शकले नाही. या काळात राणा समर्थक महिलांनी गनिमीकावा करीत पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या राठीनगर येथील निवासस्थानासमोर बेशरमचे झाड लावून साडीचोळीचा अहेर भेट म्हणून दिला होता. पालकमंत्र्यांच्या घरासमोर तैनात असलेले वाहतूक शाखेतील कर्मचारी यज्ञेश्वर दिगंबर अंबुलकर (५३) यांनी सदर महिलांना हटकल्यानंतर त्यांना दगड फेकून मारण्यात आले होते. या प्रकरणी यज्ञेश्वर अंबुलकर यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करून राणा समर्थक महिलांचा शोध सुरू केला. त्यानुसार सदर चार राणा समर्थक महिलांना अटक करण्यात आली.