भारताला ‘डिजीटल स्ट्राइक’ देखील माहिती, चीनबद्दल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनच्या 59 मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घातली आहे. यात टिक-टॉकसह अन्य अ‍ॅप्सचा समावेश आहे. सरकारच्या या हालचालीने चीनला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालणे याला त्यांनी ‘डिजिटल स्ट्राइक’ म्हटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या डिजिटल मेळाव्याला संबोधित करताना रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘भारताला शांतता हवी आहे. परंतु जर कोणी आमच्याकडे वाईट दृष्टीने पाहिले तर आम्ही त्यास योग्य उत्तर देऊ. आम्ही चीनच्या अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घालून देशवासियांच्या डेटाचे संरक्षण केले आहे. हा डिजिटल स्ट्राइक आहे. चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या तणावाबद्दल त्यांनी माकपलाही लक्ष्य केले. रविशंकर प्रसाद म्हणाले, माकप चीनवर टीका का करत नाही?