स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का ! प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा राजीनामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्ष आपापल्या मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी करत आहेत तर काही ठिकाणच्या याद्याही जाहीर झाल्या आहेत. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज पदाचा त्याचबरोबर संघटनेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.

२०१४ मध्ये राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर तुपकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पद सोपवण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी महायुतीविरोधात भूमिका घेतल्यानंतर तुपकर यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता.

पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना रविकांत तुपकर यांनी आज संघटनेचे पद व सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे कळवल्यानंतर, शेट्टी यांनी त्यांना तुम्ही संघटनेत अनेक वर्षे कामे केली असून पुन्हा एकदा या निर्णयाबद्दल विचार करण्यास सांगितले होते. मात्र याकडे लक्ष न देता, तुपकर यांनी शेट्टी यांना थेट राजीनामा पत्रच स्वाक्षरीसह पाठवले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय लिहिले आहे राजीनामा पत्रात :
संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना पाठविलेल्या पत्रात तुपकर यांनी म्हटले आहे, “मी अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. परंतु आज मी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.” यानंतर राजकारणातील पुढील वाटचालीसाठी तुपकर यांचा काय निर्णय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Visit : policenama.com