रवींद्र बर्‍हाटे यांच्या स्थावर मालमत्ता जप्तीचे न्यायालयाचे आदेश

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे याच्या स्थावर मालमत्ता जप्तीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कोथरुड पोलीस ठाण्यात रवींद्र बर्‍हाटे याच्यासह चार जणांवर खंडणीसह फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर जुलैपासून रवींद्र बर्‍हाटे फरार झाला आहे.

बर्‍हाटे याच्या कोंढव्यातील मधुसुधा अपार्टमेंटमध्ये २ फ्लॅट, धनकवडीतील तळजाई पठार येथील सरगम सोसायटीमधील एक मोकळा प्लॉट आणि याच सरगम सोसायटीतील एका प्लॉटवरील बंगला व कात्रज भागातील भागीदारीमधील जमीन अशी करोडो रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

कोथरुडमधील खंडणी व फसवणूकीच्या गुन्ह्यातील दीप्ती आहेर, शैलेश जगताप, देवेंद्र जैन व अमोल चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्रही दाखल करण्यात आले आहे. मात्र, यातील मुख्य सुत्रधार रवींद्र बर्‍हाटे याला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याला १३ जानेवारी रोजी फरार घोषित केले. तो अद्याप मिळवून न आल्याने सोमवारी न्यायालयाने त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.