Ind Vs Aus : बॉक्सिंग डे कसोटीपुर्वी टीम इंडियासाठी खुशखबर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला शनिवारी सुरुवात होणार आहे तत्पूर्वीच भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजानं फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी जडेजा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे भारतीय संघात आनंदाचं वातावरण आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात जडेजाला स्नायूंची दुखापत झाली. त्याच लढतीत मिचेल स्टार्कने टाकलेला चेंडू डोक्यावर आदळल्याने जडेजाला ‘कन्कशन’च्या दुखापतीमुळे उर्वरित दोन सामन्यांसह पहिल्या कसोटीलाही मुकावे लागले. परंतु या दोन्ही दुखापतींतून जडेजा पूर्णपणे सावरला असून त्याने सरावालाही प्रारंभ केला आहे.

आपल्या अष्टपैलू खेळीनं जडेजानं एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. विराट कोहली, मोहम्मद शामीच्या अनुपस्थिती भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं खडतर आवाहन होतं. मात्र जडेजा फिट झाल्यामुळे भारतीय संघानं सुटकेचा श्वास सोडला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजाला संधी मिळणार का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, अ‍ॅडलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाचा झालेला मानहाणीकारक पराभव पाहाता दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जडेजाची निवड जवळपास नक्की समजली जात आहे. ३२ वर्षीय जडेजाला दुसऱ्या लढतीत सहाव्या क्रमांकावरील फलंदाज हनुमा विहारीच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे. कोहली आता पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतणार असल्याने जडेजाच्या उपलब्धतेमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता काहीशी कमी झाली आहे.

४९ कसोटींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये भारतासाठी दुहेरी योगदान दिले. त्यातच आता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही जायबंदी झाल्याने भारत चारऐवजी पाच परिपूर्ण गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता अधिक आहे. जडेजाच्या रूपात भारताच्या संघात किमान एकमेव डावखुऱ्या फलंदाजाचा समावेशही होईल. तर दुसरीकडे कसोटीत विहारीने दोन्ही डावांत अनुक्रमे १६ आणि ८ धावा केल्या. आतापर्यंतच्या १० कसोटींमध्ये त्याला एकच शतक झळकावता आले असून त्याला कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक फलंदाजीचे तंत्र विकसित करण्याची गरज आहे.