क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी देखील राजकारणात, ‘या’ पक्षात करणार प्रवेश

नवी दिल्ली: वृत्तसंस्था  – क्रिकेट क्षेत्रातील अनेक मंडळींनी राजकारणात प्रवेश केल्याचे आपण पाहिले आहे. नवज्योत सिंग सिद्धू , सनत जयसूर्या, सचिन तेंडुलकर, इम्रान खान, अर्जुन रणतुंगा असे अनेक क्रिकेटपटू राजकारणात आले आहे. आता क्रिकेटपटू मोहम्मद शमी यांची पत्नी हसीना जहाँने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा आता पूर्णपणे राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहे.
राजपूतांची संघटना असलेल्या करणी सेनेने रिवाबा हिला गुजरातच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदी चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या चित्रपटाच्या नावावरुन करणी सेनेने मोठा वाद निर्माण केला होता. तसेच, चित्रपटाला विरोधही दर्शवण्यात आला होता.
करनी सेनेचे अध्यक्ष महिपाल सिंह मकराणा यांनी राजकोटमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली आहे. या कार्यक्रमाच्यावेळी जडेजाची पत्नी रिवाबाही उपस्थित होती. यावेळी रिवाबानेही स्पष्ट केले आहे की, ती महिलांना आणि मुलींना सशक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, 29 वर्षाचा असलेला भारतीय फिरकीपटू रविंद्र जडेजाने 2016 मध्ये रिवाबासोबत लग्न केले होते. त्या दोघांना एक मुलगीदेखील आहे. तसेच, यावर्षीच जामनगरमध्ये एका अपघातात पोलिसांकडून रिवाबावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थात करणी सेनेने अंदोलन केले होते. रिवाबा ही मूळ जूनागढची रहिवाशी आहे.
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.चिअर लिडर आणि मॉडेल असलेली हसीन आता राजकारणात उतरणार आहे. हसीन जहाँ हिने  शमीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. त्याचबरोबर त्याच्यावर मॅच फिक्सिंगचाही संशय घेतल्याने एकच खळबळ माजली होती.  या घटनेमुळे ती प्रकाश झोतात अली होती. तिने मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काही महिन्यापूर्वीच झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या आधी भारतीय क्रिकेट वर्तुळात हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी यांच्यातील वादाने खळबळ माजली होती. यामुळे  महम्मद शमी चांगलाच अडचणीत आला होता. हसीनने याचबरोबर शमीवर विवाह बाह्य संबध असल्याचा आरोप देखील केला होता.
हसीन जहाँने मोहम्मद शमीवर फसवणूक, हत्येचा प्रयत्न, बलात्कारासह अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजरवरचे मेसेज यांचे स्क्रीन शॉट पोस्ट करत त्याचे दुसऱ्या महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. मोहम्मद शमीच्या कुटुंबीयांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचाही आरोप हसीन जहाँने केला होता.
तसेच हसीनने शमीवर मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता. यामुळे शमीला चौकशीला सामोरे जावे लागले होते. बीसीसीआय आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडून त्याची चौकशीही झाली होती. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर प्रश्वचिन्ह उपस्थित झाले होते. ज्यामुळे बीसीसीआयने आपल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून शमीचं नावही वगळलं होतं. पण नंतर चौकशीत हे आरोप निराधार असल्याचं सिद्ध झाल्यानंतर शमीचं नाव पुन्हा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये घेण्यात आलं. बीसीसीआयच्या चौकशीत त्याला क्लिन चीट मिळाल्याने दिलासा मिळाला.
चिअर लिडर आणि मॉडेल असलेली हसीन जहाँ बऱ्याच महिन्यांपासून प्रसिध्दीच्या झोतात नव्हती. पण, आता ती पुन्हा प्रकाश झोतात आली आहे. तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे फोटो सोशल मीडियवर झळकले आहेत.