‘आयर्नमॅन’ रविंदर सिंघल औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिकचे पोलीस आयुक्त ‘आयर्नमॅन’ रविंदर सिंघल हे आता औरंगाबाद परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील. तर औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पी. पी. मुत्याळ यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहा विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

रवीदर सिंघल हे १९९८ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरींगमधून इलेक्ट्रीकल इंजियनियरींगचे शिक्षण घेतले. त्यानंतर दोन वर्ष गेल (गॅस अथॉरिटी ऑफ इंडीया लिमिटेड)मध्ये काम केले. त्यांनी नाशिकसह सांगली, अमरावती, ठाणे, नांदेड या शहरांमध्ये काम पाहिले आहे. २०१६ मध्ये ते नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले. तत्पुर्वी ते मुंबईतील प्रशिक्षण व खास पथके येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी देशात तसेच युएनच्या माध्यमातून परदेशात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

२००५ ते २००७  या कालावधीत त्यांनी कोसोवो येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता समीतीच्या युद्ध अपराध तपास युनीटचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यासोबतच २००३ मध्ये नाशिकचे पोलीस अधिक्षक असताना त्र्यंबकेश्वर येथे पार पडलेल्या कुंभमेळ्याच्या आयोजनात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.  तर २०१६ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या आयर्नमॅन – २०१८ ही स्पर्धा त्यांनी जिंकली होती. रविंदर सिंघल यांना २०१३ मध्ये राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. तर २००६ मध्ये उच्च सेवा पदकाने संयुक्त राष्ट्राने सन्मानित केले आहे.