मनसेच्या नव्या ‘झेंड्या’बाबत रावसाहेब दानवेंचा ‘आक्षेप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनचं आज पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनामध्ये मनसेनं आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. नव्या झेंड्यासोबतच मनसेचा हिंदुत्वाचा अजेंडा अधिक ठळक झाल्याचे दिसून येत आहे. मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा छापण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचे अनावरण ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले. मात्र, मनसेच्या नव्या झेंड्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी आक्षेप घेतला आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे यांनी मनसे आज अनावरण केलेल्या झेंड्यावर आक्षेप घेतला. तसेच मनसेच्या आजच्या महाअधिवेशनात सावरकरांचे फोटो लावण्यात आले आहेत. मात्र, फक्त फोटो लावून चालत नाही, तर त्यांनी सावरकरांचे विचार सुद्धा आपल्या डोक्यात घालावे असा टोला दानवेंनी मनसेला लगावला.

मनसेने आपल्या भगव्या रंगाच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा वापरली आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, राजमुद्रा आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने वापरलेली नाही. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाच्या ध्वजावर राजमुद्रा असू नयेत असा आक्षेप दानवे यांनी यावेळी घेतला आहे. त्यामुळे मनसेच्या झेंड्यावरून नवे वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –