रयत को-ऑप. बँकेमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा लिलया वापर – चेअरमन पोपटराव पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बँकेच्या विविध कर्ज योजना, ठेवी, कर्ज यामध्ये वाढ झाली आहे. मोबाईल बँकिंग, आरटीजीएस-एनईएफटी या सुविधांचा सभासद वापर करीत आहेत, बदलत्या तंत्रज्ञानाचा बँकेमध्ये अवलंब केला जात आहे. बँकेतील सेवक उत्तम सेवा देत आहेत, ही समाधानाची बाब आहे, असे मत दी रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

हडपसर येथे दी रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचा 80 वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी रयतचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य चंद्रकांत वाव्हळ, जनरल बॉडी सदस्य अरविंद तुपे, सहायक विभागीय अधिकारी शंकर पवार, शहाजी कोळेकर, बी. एन. पवार, विजय शितोळे, प्राचार्य चंद्रकांत खिलारे, प्राचार्या सुजाता कालेकर, राष्ट्रपती युवा पुरस्कार विजेते डॉ. शंतनू जगदाळे, बँकेचे चेअरमन पोपटराव पवार, व्हाईस चेअरमन लालासाहेब खलाटे, विजयकुमार डुरे, अर्जुन मलगुंडे, बाबासाहेब शेख, प्रमोद कोळी, शहाजी मखरे, जंबुकुमार आडमुठे, ज्ञानेश्वर शेटे, राजेंद्र शिंदे, डॉ. बिरू राजगे, बँकेचे सरव्यवस्थापक संजयकुमार मगदूम आदी उपस्थित होते. यावेळी सभासदांच्या विशेष गुणवत्ताधारक मुलांचा आणि विशेष पुरस्कारप्राप्त सभासदांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

चंद्रकांत वाव्हळ म्हणाले की, बँकेच्या ठेवी आणि नफ्याचा चढता आलेख समाधानाची बाब आहे. संस्थेची रयत बँक ही सहकारी बँकांमध्ये पहिल्या क्रमांकाची बँक म्हणून नावारूपाला आली पाहिजे. रयतचे सेवक वेळेचा विचार न करता जास्तीत जास्त वेळ संस्थेसाठी देत आहेत, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले. प्रा. विश्वास देशमुख व प्रतापराव गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.