Pune : रयत शिक्षण संस्था शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ – विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी

पुणे : रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असून, शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ बनून तेवत आहे. ज्ञान, विज्ञान- संगणक आणि तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रात विद्यार्थी घडवत आहे. बहुजनांना शिक्षण मिळावे म्हणून डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षणच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे, त्यामुळे पालक-विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे, असे रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी यांनी सांगितले.

रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयामधील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला रत्नपारखी व साधना विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रयत बँकेचे उपाध्यक्ष लालासाहेब खलाटे, कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर, मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर, तमन्ना सय्यद, झीनत सय्यद, मुख्याध्यापक शिवाजी भाडळे, हरिभाऊ खेत्रे, आदिनाथ पिसे, प्रतिभा कुंभार, पांडुरंग गाडेकर, मारूती शिंदे, सुभाष चव्हाण उपस्थित होते.

प्राचार्य शितोळे म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्यामुळे बहुजनांना शिक्षण मिळाले. अण्णा खऱ्या अर्थाने आधुनिक ज्ञानभगीरथ आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.