रयतमाऊलींचे कार्य समाजासमोर आले पाहिजे – प्राचार्य अंकुश साळुंके

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   असीम त्यागातून रयत शिक्षण संस्थेची पायाभरणी करणाऱ्या रयतमाऊली लक्ष्मीबाई पाटील यांचे कार्य समाजासमोर आले पाहिजे, असे मत बारामती येथील शाहू हायस्कूलचे प्राचार्य अंकुश साळुंके यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या बारामतीमधील श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कर्मवीरांच्या व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक संजय ढवाण, गणपत तावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य साळुंके म्हणाले की, लक्ष्मीबाईंनी स्वातंत्र्यपूर्व काळात अठरापगड जाती धर्माच्या मुलांचा सांभाळ केला. आपल्याजवळचे १२० तोळे सोने आणि आपले मंगळसुत्रसुध्दा गोरगरीब, पददलित मुलांच्या शिक्षणासाठी विकले. त्यांच्या असीम त्यागानेच रयत शिक्षण संस्थेची पायाभरणी झाली. आज या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे, ही संस्थेमध्ये शिक्षण घेणारी मुले उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, ही बाब अभिमानाने सांगाविशी वाटते, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी गणपत तावरे, प्रा अजय शिंदे यांनी कर्मवीरांच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, विद्यार्थ्यांनींनी ऑनलाईन भाषणे केली.

प्रियांका कदम यांनी केले. पर्यवेक्षक संजय ढवाण प्रास्ताविक केले. रोहिणी टेके यांनी आभार मानले.