लग्न सोहळ्याला परवानगी तर मग मशिदी बंद का ?, रझा अकादमीचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अनेक धर्मिक स्थळं बंद केली आहेत. लॉकडाऊननंतर अनलॉकच्या प्रक्रियेत धार्मिक स्थळं उघडली जातील असे वाटले होते. मात्र, धार्मिक स्थळं उघडण्यास सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. यापार्श्वभूमीवर मुंबईतल्या रझा अकादमीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मशिदींमध्ये नमाजासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून ही परवानगी द्यावी असं पत्रात म्हटलं आहे. त्यासाठी अकादमीने हायकोर्टाच्या एका निकालाचा हवालाही दिला आहे. रझा अकादमीने मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रामध्ये जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वानिमित्त हायकोर्टाने मंदिर सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याचा हवाला दिला आहे.

पवित्र रमजान महिना आणि ईद होऊन आता काही महिने झाले आहेत. दररोजची प्रार्थना आणि शुक्रवारची खास प्रार्थना यापासून आम्ही वंचित आहोत. लग्न समारंभाला माणसं जमू शकतात, अंत्यसंस्काराला जाऊ शकतात तर मग मशिद बंद ठेवण्यात काय अर्थ आहे असा सवालही रझा अकादमीने आपल्या पत्रात केला आहे. सर्व नियमांचं पालन करून मशिद पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

15 ऑगस्ट पासून ही परवानगी द्यावी असंही रझा अकादमीने लिहीलेल्या आपल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात एका दिवसाला 60 हजाराहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गेल्या 24 तासातही 60 हजार 963 रुग्ण सापडले आहेत. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 लाखाच्या वर गेली आहे. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के झाले आहे.