खुशखबर ! कार्ड, मोबाईलद्वारे ऑफलाईन पेमेंटला RBI देणार परवानगी, काम होणार सोपं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी (दि.6) पत्रकार परिषदेत पतधोरण जाहीर केले. आरबीआयने व्याज दरात कोणताही बदल केला नाही. तसेच कोरोना संकटाच्या वेळी ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोने तारण कर्जदरांना मोठा दिलासा दिला आहे. आता लवकरच कार्ड आणि मोबाईलच्या माध्यामातूनही ऑफलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अनेकवेळा डेबिट किंवा क्रडिट कार्डवरून पेमेंट करत असताना ते होत नाही. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव अथवा इतर कोणत्याही कारणामुळे ते पेमेंट पूर्ण होत नाही. पण आता ही अडचण दूर होणार असून एक नवा पर्याय समोर येत आहे. आरबीआयने प्रायोगिक तत्वावर सुरक्षितरित्या कमी रक्कमेच्या पेमेंटसाठी ऑफलाईन सेवेला परवानगी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या योजनेतंर्गत अधिकृत पेमेंट सिस्टम ऑपरेटर (पीएसओ), बँका आणि नॉन कार्ड, वॉलेट्स आणि मोबाइलचा वापर करत ऑफलाईन पेमेंट सेवा देण्यास सक्षम असणार आहेत.

योजना फक्त 31 मार्च 2021 पर्यंतच
मोबाईल फोन, कार्ड, वॉलेट इत्यादीचा वापर करून डिजिटल पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, विशेषत: दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नसल्याने अडचण होते. त्यामुळे अशाप्रकारे ऑफलाईन पेमेट सुविधा देण्याची योजना आणली आहे.