खुशखबर ! RBI ची मोठी घोषणा, ‘या’ पेमेंट सिस्टीममधून भरता येणार मुलांची फीस, विम्याचा हप्‍ता आणि सर्व बीले, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी भारत बिल पेमेंट सिस्टम (बीबीपीएस)च्या विस्ताराची घोषणा केली. आता या प्रणाली अंतर्गत सर्व बिले भरता येतील. यामध्ये शालेय फी, विमा प्रीमियम आणि कॉर्पोरेशन टॅक्सचा समावेश आहे. आतापर्यंत बीबीपीएसद्वारे डीटीएच, वीज, गॅस, टेलिकॉम आणि पाण्याची बिले अशा पाच प्रकारचीच बिले भरता येत होती.

रिझर्व्ह बँकेने परिपत्रकात म्हटले आहे की बीबीपीएसची व्याप्ती वाढविण्यामध्ये सर्व प्रवर्गांची बिले भरणे समाविष्ट केले आहे. बीबीपीएस नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) अंतर्गत कार्यरत आहे.

बीबीपीएस वेबसाइटनुसार, विमा प्रीमियम, म्युच्युअल फंड, शाळा शुल्क, ईएमआय आणि कॉर्पोरेशन टॅक्स यासारख्या वारंवार भरल्या जाणार्‍या बिले समाविष्ट करण्यासाठी या सुविधेचा विस्तार करण्यात आला आहे.

टॅक्समनचे डेप्युटी जनरल मॅनेजर रचित शर्मा म्हणाले की रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे भारत बिल पेच्या वापरकर्त्यांची संख्या वाढेल आणि ग्राहकांचा विश्वास जिंकण्यास मदत होईल.